नळदुर्ग :- शेतीमध्ये दुसरा वाटेकरी होऊ नये म्हणुन 17 वर्षाच्या मुलांने स्वताच्या बापाच्या डोक्यात दगड घालुन त्याचा खुन केल्याची घटना 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मानेवाडी ता. तुळजापुर येथे घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली असुन याबाबत नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हा अल्पवयीन असुन पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मानेवाडी ता. तुळजापुर येथील महीपती आंबाजी सुरवसे वय 45 यांनी आपली पहिली पत्नी अनिता वारल्यानंतर इराप्पा या महिलेसोबत दुसरा विवाह केला होता. महिपती याला पहिल्या पत्नीपासुन म्हाळप्पा व धुळप्पा ही दोन मुले आहेत. तर दुसरी पत्नी इराप्पा याला एक मुलगी आहे. आपल्या वडिलांने दुसरा विवाह केल्यानंतर पत्नी इराप्पा हिचे कुटुंब नियोजनचे ऑपरेशन केले नाही याचा राग धुळप्पा याला होता. 16 जानेवारी रोजी सकाळी 6 वा. धुळप्पा हा स्वताच्या अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथील शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेला होता. त्यानंतर धुळप्पा याचे वडील महिपती आंबाजी सुरवसे हे धुळप्पा याचा जेवणाचा डबा घेऊन शेतात गेले होते. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास धुळप्पा याने वडील महिपती यांच्यासोबत भांडण करून महिपती याच्या डोक्यात दगड घालुन त्याला ठार मारले असल्याची फिर्याद लक्ष्मीबाई आंबाजी सुरवसे यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली आहे. घटनेची माहिती मिळताचा नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव व त्यांच्या सोबत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन परीस्थितीची पाहणी करून यामधील आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे.आपले वडील सावत्र आईचे कुटुंबनियोजनचे ऑपरेशन करत नाहीत त्यामुळे आपल्या सावत्र आईला अपत्य होऊन आपल्या शेतात दुसरा वाटेकरी होईल याचा राग मनात धरून धुळप्पा या 17 वर्षाच्या मुलाने स्वताच्या बापाच्या डोक्यात दगड घालुन खुन करण्याच्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.घटनास्थळाला अप्पर पोलिस अधीक्षक शफाकत आमना , उपविभागीय पोलिस अधिकारी शेलार तसेच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव व सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, सूर्यकांत फुलसुंदर, खालील शेख यांनी भेट दिली आहे.याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी आरोपी धुळप्पा महिपती सुरवसे वय 17 वर्ष याच्या विरोधात गुरनं. 24/2026 कलम 103 (1) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन यादव हे करत आहेत.
