प्रशासनाच्या नाकावर टिचून मटका, गुटखा गहू तांदळाची काळया बाजारात विक्री रासायन मिश्रित हातभट्टी दारूसह सर्वच अवैध धंदे जोमात

 

नळदुर्ग :- नळदुर्ग शहर व परिसरातील काही गावात गेल्या काही महिन्यापासून पुरवठा विभाग ,राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग,अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून  मटका, गुटखा, जुगार, गहू तांदळाची काळया बाजारात विक्री व रसायन मिश्रित हातभट्टी दारू, शिंदी सह  सर्वच अवैध धंदे जोमात सुरू आहेत धक्कादायक बाब म्हणजे एका मोठ्या राजकीय नेत्याचा बगलबच्चा असलेला हा  तथाकथित नेता शहराच्या विकासासाठी पुढाकार घेण्याऐवजी   स्वतःचा आर्थिक विकास करून घेण्यासाठी प्रशासनाची व आपल्या नेत्याची अब्रू वेशीवर टांगत प्रशासनाला  खुले आव्हान देत  मटका बुकी नळदुर्ग शहरात सुरू केली आहे. त्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात नळदुर्ग शहर व परिसरात होत आहे. आणि  त्याचा सर्वाधिक फटका शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत असल्यामुळे 15 ते 22 वयोगटातील एक युवा पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण मटका, गुटखा व रसायन मिश्रित  हातभट्टी दारू च्या आहारी गेलेले तरुणांची अवस्था ओपन जेवू देईना कुलोज झोपू देईना अशी झाल्यामुळे  रात्रभर जागरण करत बस स्थानक परिसरात फिरताना दिसत आहेत.त्यामुळे ऐतिहासिक नळदुर्ग शहरातील  एक युवा पिढी वाया जाण्याच्या मार्गावर आहे. याला कुठेतरी पाय बंद करणे गरजेचे आहे. कारण ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या नळदुर्ग शहर हा आता अवैध धंद्यावाल्यांचा माहेरघर बनला आहे   विशेष म्हणजे या सर्व अवैध धंद्यांची माहिती ज्यांच्या खांद्यावर सुशासन चालविण्याची जबाबदारी आहे. त्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना असताना सुद्धा काहीजण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून डोळे झाक करीत असल्यामुळे शहरात अवैध धंद्याना ऊत आला आहे. हे सर्वच अवैध धंदे प्रशासनाच्या नाकावर टिचून खुलेआम सुरू आहेत.  त्यामुळे संबंधित प्रशासनाने अशा खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम उघडून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. महत्त्वाची बाब  म्हणजे जळकोट व नळदुर्ग येथील  मटक्याच्या बुक्की वाल्यांनी ईटकळ अणदुर, नळदुर्ग, जळकोटसह परिसरातील ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यात नळदुर्ग शहरातील किल्ला गेट , क्रांती चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक, बस स्थानक परिसरात महामार्ग लगत दोन्ही बाजूला,इंदिरा नगर, वसंत नगरसह शहराचा मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बसस्थानक परिसरातील अक्कलकोट रोड येथे सर्वच अवैध धंदे सुरू असल्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचा हा गड बंद बनला आहे. शहरात जवळपास पंधरा ते वीस  मटका एजंट खुलेआम मटका घेत आहेत. त्यापैकी जवळपास आठ ते दहा जण अक्कलकोट रोडवरील डीएड कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यावरील नगरपालिकेच्या जागेवर तसेच नळदुर्ग- अक्कलकोट रस्त्याच्या लगत बांधण्यात आलेल्या गटारीवर शेड मारून मटक्याचा धंदा सुरू केले आहेत. चिंतेची बाब म्हणजे याच अक्कलकोट रोड परिसरात 2 इंग्रजी शाळा, 1 जिल्हा परिषद कन्या प्रशाला  व 1 अध्यापक विद्यालय असे 4 शैक्षणिक संस्था   आहेत. आणि  याच परिसरात सर्व अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. त्याचा त्रास या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांना मोठ्या प्रमाणात होतो. नळदुर्ग व परिसरातील ग्रामीण भागातून  दररोज लाखो रुपयांचे उलाढाल मटक्याच्या धंद्यातून होत आहे. त्यामुळे मटका खेळणाऱ्या व घेणाऱ्या लोकांची अवस्था ओपन जेवू देईना क्लोज झोपू देईना अशी झाली आहे. हे सर्व अवैध धंदेवाल्यांना हाताळण्याची जबाबदारी एका मोठ्या साहेबाच्या वसूलदाराने आपल्या खांद्यावर घेतल्याची चर्चा नळदुर्ग परिसरात मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र तो कोण हे मात्र गुलदस्त्यात आहे.

***************************अन्न व औषध प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे राज्यात गुटखाबंदी असताना  अणदूर,जळकोट, लोहगाव, सलगरा व नळदुर्ग येथील 5 मोठे गुटखा तस्कर कर्नाटक राज्यातील बसवकल्याण व आळंद येथून  प्रतिबंधित गुटखा आणून  नळदुर्ग व परिसरातील ग्रामीण भागामध्ये  खुलेआम विक्री करून प्रशासनाला एका प्रकारे आव्हान देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे  खरोखरच गुटखाबंदी आहे की केवळ कागदावर हे प्रश्न उपस्थित होत आहे.

************************

त्याचबरोबर नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रोडसह शहरातील विविध भागांमध्ये व परिसरातील ग्रामीण भागात रसायन मिश्रित हातभट्टी दारू व शिंदीची  विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या हॉटेल्स तसेच धाब्यावर मोठ्या प्रमाणात विनापरवाना देशी- विदेशी दारूची विक्री केली जात आहे. त्यामुळे तरुण पिढी दारुच्या आहारी जाऊन वाया जाण्याच्या वाटे आहे. त्याला केवळ आणि केवळ दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षपणा जबाबदार आहे. कारण नळदुर्ग शहर व परिसरामध्ये देशी- विदेशी, हातभट्टी दारूचा बेकायदेशीर साठा ठेवून विक्री करण्याचा धंदा जोमात सुरू आहे. ड्रायडे च्या दिवशी बियर बार बंद असताना मात्र तळीरामांना हॉटेल्स व धाब्यांवर सहज दारु उपलब्ध होते.  त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क चा दारूबंदी विभाग काय करतो असा प्रश्न उपस्थित होतो. आणि हा काम आपला नाही म्हणत सर्व संबंधित विभागातील अधिकारी  एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. या हातभट्टी दारूमुळेच सण उत्सवात तरुण मुले दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होते त्यामुळे असे धंदे  कायमचे बंद होणे गरजेचे आहेत.

***********************

 नळदुर्ग शहर परिसरातील काही दुकानदार व दलाल गोरगरिबांच्या तोंडाचा घास असलेल्या रेशनिंगच्या गहू तांदळाची काळया बाजारात विक्री करीत आहेत आणि हा शासकीय माल खरेदी करण्यासाठी सोलापूर- वैराग येथील गहू- तांदळाची तस्करी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. रेशनिंगच्या गहू तांदळाची ओळख पटू नये याकरिता वाहनामध्ये माल भरण्यापूर्वीच व त्यांची अदलाबदल करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 सोलापूर- हैदराबाद रोड तसेच नळदुर्ग- तुळजापूर रोड वरून याची खुलेआम बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. मात्र याच्यावर कसल्याच प्रकारची ठोस कारवाई का केली जात नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे. अनेकदा गहू तांदळाचे वाहने तपासणीसाठी अडविले जातात मात्र त्यानंतर शासकीय माल नाही असे सांगून सोडण्यात येते. ती कोणत्या आधारावर सोडली जातात  हे देखील गुलदस्त्यात आहे. कारण एखाद्या वाहनामध्ये भरलेला माल हा शासकीय आहे किंवा नाही याची खात्री करण्याकरिता फोर्टी फाईड लॅब टेस्टिंग करणे गरजेचे आहे. ते केली जाते का ? लॅब टेस्टिंगचा रिपोर्ट आल्यानंतरच सहनिशा करून वाहने  सोडली जातात का? की चिरीमिरी घेऊन सोडतात  हे पहाणे गरजेचे आहे. कारण गहू तांदळाचे काळाबाजार करणारे तस्कर यात सहभागी असलेली स्थानिक दुकानदारांकडून कच्चे  ई वे बिल घेतात व  दाखवून निघून जातात त्याची देखील सहनिशा करणे गरजेचे आहे आणि याला आळा घालण्यासाठी पुरवठा विभाग व पोलीस शासनाच्या पथकाकडून संयुक्त कारवाई होणे गरजेचे आहे.

***************************

महत्त्वाची बाब म्हणजे मटका,   गुटखा,जुगार, हातभट्टी दारू व गहू- तांदळाचा काळाबाजार नळदुर्ग व परिसरातील ग्रामीण भागात  सुरू असल्याची माहिती दारूबंदी विभाग, अन्न व औषध प्रशासन, पुरवठा अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना आहे. मात्र तेरी भी चूप मेरी चूप म्हणत नळदुर्ग शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होत नसल्याने  नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे व असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की संबंधित खात्याचे पथक प्रत्येक महिन्यातून एकदा का होईना  नळदुर्ग शहरात आलेले दिसतात मात्र ते शहरात कशासाठी येतात ? काय करतात हे  गुलदस्त्यात आहे.

*************************

मटका, गुटखा, हातभट्टी दारू व गहू- तांदळाच्या अवैध धंद्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आधीच प्रवेश केला होता मात्र राजकीय क्षेत्रातील व्हाईट कॉलर वाल्या तथाकथित नेत्यांनी अवैध धंद्याच्या माध्यमातून शहरवासीयांना लुटण्याचा धंदा  प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू केल्यामुळे जनतेचे रक्षकच आर्थिक फायद्यासाठी भक्षक बनले आहेत याला वेळीच पाय बंद करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात अवैद्य धंद्याच्या स्पर्धेतून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

************************ नळदुर्ग व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना सुद्धा असताना सुद्धा सर्वच राजकीय पक्षाचे नेत्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. कारण अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये काही कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी या गंभीर विषय कडे जाणीवपूर्वक  दुर्लक्ष करून तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणून मौन धारण केले असल्याचे दिसून येत आहे जे चिंतेचा विषय आहे.

****************************

Post a Comment

Previous Post Next Post