नळदुर्ग येथील आलियाबाद स्मशानभुमीत लाईट नसल्याने रात्रीच्या वेळेस अंधारातच करावा लागतो अंत्यविधी

 

नळदुर्ग :- नळदुर्ग येथील आलियाबाद हिंदु स्मशानभुमीत लाईट नसल्याने रात्रीच्या वेळेस याठिकाणी अंत्यविधी करायचे म्हटले तर ती अंधारातच करावे लागते. याचा फार मोठा त्रास याठिकाणी नागरीकांना तसेच मयताच्या कुटुंबाना होत आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ आलियाबाद स्मशानभुमीत लाईटची व्यवस्था करावे अशी मागणी संतप्त नागरीकांनी केला आहे.नळदुर्ग शहरातील हिंदु धार्मियांसाठी एकच आलियाबाद स्मशानभुमी आहे. एक तर ही स्मशानभुमी शहरापासुन लांब अंतरावरआहे.शहरापासुन ही स्मशानभुमी 2 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर शहरातील व्यासनगर, व्यकटेशनगर, रामलीलानगर, भवानी नगर, इंदिरानगर या वरच्या भागातील नागरीकांसाठी तर ही स्मशानभुमी यापेक्षा लांब अंतरावर आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या स्मशानभुमीत गेल्या अनेक वर्षांपासुन लाईटच नाही. वास्तविक पाहता ही बाब अतिशय दुर्दैवाची आहे. रात्रीच्या वेळेस या स्मशानभुमीत अंत्यविधी करायचे म्हटले तर अनेक संकटाना सामोरे जावावे लागते. स्मशानभुमिकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाईट नाही. त्याचबरोबर स्मशानभुमीतही लाईट नाही तसेच स्मशानभुमीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असुन स्म्शानभुमीत काटेरी झुडपे, गवत मोठ्याप्रमाणात आले आहे. त्यामुळे अंत्यविधी करतांना याठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावावे लागत आहे. वास्तविक पाहता स्मशानभुमीत सर्वत्र स्वच्छता तसेच फुलांची झाडे व सर्वात महत्वाचे म्हणजे लाईट असणे गरजेचे आहे. आज नगरपालिकेच्या वतीने शहरात प्रत्येक चौकात विजेच्या खांबावर चार, चार बल्ब बसविण्यात आले आहे. तर दुसरीकडे जे ठिकाण नळदुर्ग शहरातील हिंदु धर्मातील प्रत्येक व्यक्तीचे अंतीम ठिकाण आहे त्या आलियाबाद स्मशानभुमीत मात्र आज लाईट नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन अलियाबाद स्मशानभुमीत लाईटची व्यवस्था करण्याबरोबरच स्मशानभुमीत सर्वत्र स्वच्छता करुन स्मशानभुमीत मोठ्या प्रमाणात असलेले काटेरी झुडपे, गवत काढुन स्मशानभुमी एकदम स्वच्छ करावे.त्याचबरोबर  21 डिसेंबर नंतर नगरपालिकेचे नविन कारभारी जाहीर होणार आहेत त्यांनीही या स्मशानभुमीच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन याठिकाणी विजेची सोय करण्याबरोबरच स्मशानभुमीत स्वच्छता ठेवण्याचे काम करावे अशी मागणी होत आहे.

 *************************

 आलियाबाद हिंदु स्मशानभुमीत लाईटची व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधारातच अंत्यविधी करावी लागते. तसेच या ठिकाणी पाण्याची टाकी, बसण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी त्याचबरोबर पाणी टाकी व बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करावी जेणेकरून शहरातील तसेच  बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता नगरपालिका प्रशासनाने घ्यावी.

  अमर भाळे 

सामाजिक कार्यकर्ता

****************************

आलियाबाद येथील स्मशानभुमीत लाईट नसल्यामुळे अंधारात अंत्यविधी केली जाते हे गंभीर बाब आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये याकरिता  येणाऱ्या काही दिवसात त्या ठिकाणी लाईट,पाणी  व बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले जाईल. 

 रामकृष्ण जाधवर

 मुख्याधिकारी नगरपरिषद नळदुर्ग

****************************

Post a Comment

Previous Post Next Post