नळदुर्ग :- नळदुर्ग (आलियाबाद) येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात 5 डिसेंबर रोजी श्री राजगुरू शिवलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधीपती राजगुरू श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे.सोलापुर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग (आलियाबाद) येथे अगदी महामार्गालगत दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे. या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. या मंदिराची देखभाल तसेच पुजा अर्चा आलियाबाद गावचे पोलिस पाटील कै.बाबुराव भिमराव पाटील यांचे पाटील घराणे गेल्या शेकडो वर्षांपासुन करत आहेत. सध्या या मंदिराची देखभाल व पुजा अर्चा महेश कोप्पा पाटील हे करीत असुन पाटील घराण्याची पाचवी पिढी सध्या या मंदिराची देखभाल करत आहे. हे मंदिर राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने याठिकाणी असणाऱ्या दक्षिण मुखी हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी हनुमान भक्त मोठ्या संख्येने येतात. शेकडो वर्षांपासुन हे मंदिर या ठिकाणी उभे असल्याने मंदिराची मोठी पडझड झाली होती. त्यामुळे या मंदिराचे प्रमुख व हनुमान भक्त महेश कोप्पा पाटील यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांच्या प्रयत्नातुन तसेच त्यांना या कामात सहकार्य केलेल्या दानशुर व्यक्तींच्या सहकार्यातुन आज याठिकाणी अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर उभे राहिले आहे.याच मंदिरात 4 व 5 डिसेंबर रोजी मुर्ती प्राणप्रतीष्ठापना व कळसारोहण सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला.4 डिसेंबर रोजी नळदुर्ग शहरातुन भव्य कळस मिरवणुक काढण्यात आली. दि. 5 डिसेंबर रोजी या मंदिरात पहाटे 4 वा. होमहवन विधी पार पडला त्यानंतर सकाळी 11 वा. नळदुर्ग येथील श्री राजगुरू शिवलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधीपती राजगुरु श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसरोहनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष बसवराज धरणे,सेवानिवृत्त शिक्षक बलभिमराव मुळे, नेताजी महाबोले,माजी नगरसेवक सुधीर हजारे, लोकमान्य गणेश मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ माळगे,पप्पु पाटील,बंडप्पा कसेकर, सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, जमन ठाकुर, विलास येडगे,उत्तम बनजगोळे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे आदिजन उपस्थित होते. त्याचबरोबर दुपारी 12.30 वा. महाराजांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यानंतर उपस्थित शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिराचे प्रमुख महेश कोप्पा पाटील यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले.
