नळदुर्ग नगरपालिकेसाठी 73. 17 टक्के मतदान 2016 च्या तुलनेत दोन टक्के वाढ झाल्यामुळे त्याचा फायदा आणि फटका कुणाला बसणार? याकडे लक्ष

 

नळदुर्ग :-  नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात व शांततेत मतदान पार पडले. यावेळी एकुण 17 हजार 122 मतदारांपैकी 12 हजार 529 एवढे मतदान झाले आहे.मतदानाची टक्केवारी 73.17 इतकी आहे. मतदान करण्यासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदार मोठया संख्येने मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले होते. युवकांबरोबरच जेष्ठ नागरीकांनीही मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.मतदान पार पडल्यानंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांचे भावितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. 2016 मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत 71. टक्के मतदान झाले होते.त्याच्या तुलनेत या निवडणुकीत 2 टक्का मतदान वाढल्यामुळे त्याचा फटका कुणाला बसतो हे 21 डिसेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मतदान सुरु असतांना आमदार राणाजगजितसिंह पाटील,काँग्रेसचे नेते व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे, भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे, एमआयएमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहेबाज काझी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले यांनी मतदान केंद्राना भेटी देऊन पाहणी केली. त्याचबरोबर नगरसेवक पदाचे उमेदवारही आपापल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहुन मतदारांकडुन मतदान करून घेत होते. ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामकृष्ण जाधवर त्यांच्या टीमने परिश्रम घेतले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आजारी, दिव्यांग, तसेच जेष्ठ नागरीकांना मतदान करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करुन घेण्यात आले होते. मात्र नगरपालिका निवडणुकीत ही प्रक्रिया राबविण्यात आली नाही त्यामुळे कांही आजारी, वृद्ध, दिव्यांग मतदार मतदानापासुन वंचित राहिले आहेत.त्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक  नंदकिशोर सोळुंके, आनंद कांगूणे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, संतोष गीते व पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील 20 मतदान केंद्रावर   अतिशय कडक पोलिस बंदोबस्त लावला होता. 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी रद्द झाली असुन आता मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणी पुढे ढकलल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करुन संताप व्यक्त केला आहे.काँग्रेसचे अशोक जगदाळे, भाजपचे बसवराज धरणे, एमआयएमचे शहेबाज काझी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय बताले यांच्यापैकी नळदुर्गचा नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता नागरीकांना लागली आहे. 

*****************************************

दोन डिसेंबर रोजी  झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक1 मध्ये 1668 पैकी  1353, प्रभाग क्रमांक 2 ) मध्ये 2011 पैकी 1352, प्रभाग क्रमांक 3) मध्ये 1292 पैकी  950, प्रभाग क्रमांक 4 ) मध्ये 1398 पैकी 964, प्रभाग क्रमांक 5)मध्ये 1798 पैकी  1319, प्रभाग क्रमांक 6) मध्ये 1974 पैकी 1475, प्रभाग क्रमांक 7) मध्ये 1885 पैकी 1378, प्रभाग क्रमांक 8)मध्ये 1508 पैकी 1086, प्रभाग क्रमांक 9) 1712 पैकी  1286, प्रभाग क्रमांक 10) मध्ये 1913 पैकी 1366 असे एकूण 17 हजार 122 पैकी 15529 मतदान झाले आहे.

*****************************************

Post a Comment

Previous Post Next Post