मलिदा गॅंगच्या वाटेकऱ्यांमुळे विकास कामांना ब्रेक या निवडणुकीत त्याचा फटका कोणाला बसणार ?

 नळदुर्ग :- 45 कामांची निविदा प्रक्रिया होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा एक ही विकास कामाला सुरुवात न झाल्यामुळे नळदुर्ग शहरात याबाबत  सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे. मलिदा गॅंग मध्ये कामे वाटून घेण्याकरिता अंतर्गत वाद  सुरू असल्यामुळेच या विकास कामांना  ब्रेक लागला असल्याची नकारात्मक चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मलिदा गॅंगच्या  वाटेकऱ्यांमध्ये  सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा फटका  कुणाला बसणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून या निवडणुकीत रस्ता, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती  व रोजगार या महत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविले जात आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शहराचा विकास का झालं नाही. त्याला जबाबदार कोण  याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा मतदारांमध्ये आहे. कारण नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये निधी आला आहे. त्यात 93 कोटी रुपये खर्च करून रस्त्याची कामे केली जात आहेत. ती रस्त्याची कामे शहरामध्ये होणे अपेक्षित असताना अंदाजपत्रक तयार करताना  कसल्याच प्रकारच्या विचार न करता अंदाजपत्रक  तयार करण्यात आल्यामुळे आज    शहराच्या बाहेर ज्या ठिकाणी लोक वस्ती नाही अशा ठिकाणी रस्त्याची  कामे केली जात आहेत. त्यापैकी अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. वास्तविक पाहता शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची दुरवस्था  होऊन रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता म्हणण्याची वेळ नागरिकांनावर आली आहे.त्यामुळे हे रस्त्यांची  कामे प्रधान्य देऊन शहरात करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता  लोक वस्ती नसलेल्या ठिकाणी होत आहेत त्यामुळे याचा फायदा शहरवासीयांना कमी ठेकेदाराला जास्त होत असल्यामुळे ही कामे ठेकेदाराच्या घशात मलिदा टाकण्यासाठी तर केली जात नाही ना अशी शंका नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. तसेच पिण्याचा पाणी 24 तास मिळावा यासाठी  अमृत 2.0 योजनेअंतर्गत 46 कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. मात्र ते देखील अद्याप पूर्ण झालेले नाही.तसेच स्वच्छतेवर महिन्याला लाखो रुपये खर्च केले जातात मात्र शहरातील अनेक भागांमध्ये अस्वच्छतेमुळे घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंधी पसरली आहे. नळदुर्ग शहरांमध्ये एमआयडीसी किंवा मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे शहरातील तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहेत त्यांच्या हाताला काम मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तरुण वर्ग रोजगार मिळत नसल्यामुळे कमी वेळेत जास्त पैसा कमविण्याच्या नादी लागून गुन्हेगारी वृत्तीकडे  ढकलला जात आहे. ही चिंतेची बाब आहे आणि सर्वांसाठीच धोकादायक आहे. त्यासाठी शहरात मोठे उद्योग धंदे सुरु होणे गरजेचे होते. मात्र आज पर्यंत असा कोणताही मोठा उद्योग धंदा सुरू न झाल्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यातील नेते आल्यानंतर पांढरे कपडे घालून आम्ही शहराचा विकास करीत आहोत हे दाखविण्याकरिता मागेपुढे करीत हुजरेगिरी करून  फोटोसेशन करणारे काही तथाकथित नेत्यामुळे शहराची अक्षरशः वाट लागली आहे. वरिष्ठ नेते शासन स्तरावर प्रयत्न करून मोठ्या प्रमाणात निधी आणत आहेत ती कामे  चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी  वाटून घेण्यासाठी  स्पर्धा सुरू झाल्यामुळे तेच  एकमेकांवर चिखल फेक करून  स्वतःची अब्रू वेशीवर टांगत असल्यामुळे याची चर्चा संपूर्ण शहरभर होत आहे. जवळपास दीडशे कोटीपेक्षा जास्त निधी येऊन सुद्धा नळदुर्ग शहराचा म्हणावी तसे  विकास झालेले नाही. उलट मलिदा वाटेकऱ्यांमुळे निधी आणणाऱ्यांची व त्यांच्या पक्षाची नकारात्मक चर्चा शहरभरात मोठ्या प्रमाणात होत आहे त्याला जबाबदार कोण ? आणि या मलिदा गँगने वैयक्तिक फायद्यासाठी विकास कामांना लावलेल्या ब्रेक मुळे याचा फटका कुणाला बसणार? या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post