नळदुर्ग :- नळदुर्ग शहराच्या उज्वल भविष्यासाठी नळदुर्गच्या तिजोरीची चावी अशोक जगदाळे यांच्या हातामध्ये द्या असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव आमदार अमित देशमुख यांनी नळदुर्ग येथे नगरपालिका निवडणुकीनिमित्त काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलतांना सांगितले.नळदुर्ग नगरपालिका निवडणुकी निमित्त दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता नळदुर्ग येथील भवानी चौकात काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट युतीच्या उमेदवारांच्या प्राचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव आमदार अमित देशमुख, धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, उमरग्याचे आमदार प्रविण स्वामी,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, काँग्रेसचे तुळजापुर तालुका अध्यक्ष रामचंद्र आलुरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक डॉ. जितेंद्र कानडे, राजेंद्र शेरखाने आदिजन उपस्थित होते.जाहीर सभेपुर्वी बसस्टॅन्ड समोरील संविधान चौकापासुन भव्य पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेमध्ये प्रचंड जनसमुदाय उसळला होता. या रॅली तसेच सभेसाठी प्रचंड समुदाय उपस्थित होता.जाहीर सभेला संबोधित करतांना आमदार अमित देशमुख यांनी म्हटले की, धाराशिव जिल्हा हा माझा मुळ जिल्हा आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात येत असतांना मला मनस्वी आनंद होतो. आई तुळजाभवानीची ही भुमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचा लढा उभारण्यासाठी याच भुमीने प्रेरणा दिली आहे. त्या भुमीला मी वदंन करतो. या भुमीचे तुम्ही भुमिपुत्र आहात आणि त्या भुमीची सुरक्षा करण्याची जबाबदारी तुमची आहे.आज राज्यात महायुतीच्या सरकारने लुट चालविली आहे. आज राज्यावर महायुती सरकारने 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे. विलासराव देशमुख ज्यावेळेस महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी राज्यावर फक्त 30 ते 40 हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र महायुती सरकारने आज राज्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. सरकार मधील एकजण म्हणतो महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी माझ्या हातात आहे, दुसरा म्हणतो महाराष्ट्राच्या तिजोरीचा मालक माझा आहे तर तिसरा म्हणतो महाराष्ट्राच्या तिजोरीत जो माल आहे तो माझा आहे. महायुती सरकारने कर्ज काढुन कंत्राटदार जोपसण्याचे काम केले आहे. आज कंत्राटदारांचेही पैसे हे सरकार देत नाही त्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा कंत्राटदारांनी उपोषण केले आहे. आज तुमचे मत विकत घेण्याची भाषा ही मंडळी करत आहेत. कुणीही आपले मत विकु नये. तुमचे मत अमुल्य आहे. आज आंमली पदार्थाचे लोन धाराशिव जिल्ह्यात तुळजापुर तालुक्यात आले आहे. आई जगदंबेच्या भुमीत ड्रग्ज आले आहे. जो माणुस ड्रग्ज सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी आहे त्याला भाजपने तुळजापुर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. ज्यांनी आई तुळजाभवानीच्या भुमीला कलंकित करण्याचे काम केले आहे अशा मंडळींना या निवडणुकीत मतदारांनी गाडण्याचे काम करावे असेही अमित देशमुख यांनी म्हटले आहे.काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाचे नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे हे स्वच्छ प्रतिमेचे असुन शहराचा विकास करण्याची त्यांच्यात धमक आहे. त्यामुळे नळदुर्ग शहरातील मतदारांनी या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्यासह सर्व 20 नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने निवडुन द्या. शहराच्या विकासासाठी आम्ही निधी कमी पडु देणार नाही. खासदार ओमराजे निंबाळकर केंद्रातुन तर मी राज्यातुन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबद्ध आहोत असेही अमित देशमुख यांनी म्हटले आहे. यावेळी बोलतांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जवळपास 40 ते 45 वर्षे मंत्री म्हणुन धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व केले आज धाराशिव जिल्ह्याची अवस्था काय आहे. आज धाराशिव जिल्हा केंद्राच्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे ज्यांनी 40 ते 45 वर्षे मंत्री म्हणुन काम केले त्यांची प्रॉपर्टी पाहिली तर श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये यांचा तिसरा क्रमांक लागतो मग विकास कुणाचा झाला हे जनतेनी ठरवावे. आज जिल्ह्यात अनेक पाटील आहेत मात्र एकाकडेही 8 कोटी रुपयांची गाडी नाही मग आमदारराणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे 8 कोटीची गाडी कुठुन आली. येड्या बाभळीची शेती करुन ही गाडी आणली का? असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. यावेळी अशोक जगदाळे म्हणाले की नगरपालिकेत कुणालाही भ्रष्टाचार करू देणार नाही आणि कोणी भ्रष्टाचार केला तर ते खपवून घेतला जाणार नाही पारदर्शक आणि विकास भिमुख काम केला जाईल असे हे अशोक जगदाळे यांनी यावेळी म्हणाले.यावेळी आमदार प्रविण स्वामी यांचे भाषण झाली. प्रास्ताविक कमलाकर चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष पुदाले यांनी केले. या सभेसाठी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता. पदयात्रा व जाहीर सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटामध्ये उत्साहाचे वातावरण दिसुन आले.
