विकासाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी भाजपला विजयी करा :- आमदार राणाजगजित सिंह पाटील

 

नळदुर्ग :-  नळदुर्ग शहरात सध्या सुरु असलेल्या विकासाची घोडदौड पुन्हा कायम सुरु ठेवण्यासाठी नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला मोठया मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग येथे नगरपालिका निवडणुकीनिमित्त भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलतांना केले. या सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे शहरातील वातावरण भाजमय झाल्याचे दिसुन आले.नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक 2 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. या निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण सध्या शिगेला पोहचले आहे.जाहीर सभा, कॉर्नर सभा व पदयात्रांमुळे तसेच लाऊडस्पीकरवरून सुरु असलेल्या प्रचारामुळे शहरात फक्त आणि फक्त निवडणुकीचे वारे वाहत असल्याचे दिसुन येत आहे. नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक भाजप आणि शिवसेना शिंदे एकत्रित येऊन लढत आहेत. यामध्ये भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवारासह नगरसेवक पदाचे 18 उमेदवार आहेत तर शिवसेना शिंदे गटाला युतीमध्ये 2 जागा देण्यात आले आहेत.  23 नोव्हेंबर रोजी भाजप - शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भव्य पदयात्रा तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य नितीन काळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, ॲड. दीपक आलुरे, विलास राठोड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड आदीजन उपस्थित होते. प्रारंभी बस्थानकासमोरील संविधान चौक ते किल्लागेट पर्यंत आमदार राणा जगजितसिंह पाटील, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण व नितीन काळे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये निवडणुकीतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराज धरणे, सर्व 20 नगरसेवकपदांचे उमेदवार, भाजपचे सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.रॅलीमध्ये महिलांची संख्या मोठी होती. या रॅलीला अभुतपुर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रॅली संविधान चौकापासुन निघाल्यानंतर वाजत, गाजत लोकमान्य वाचनालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, शास्त्री चौक, भवानी चौक, चावडी चौक, क्रांती चौक मार्गे किल्ला गेट येथील जाहीर सभेच्या ठिकाणी आल्यानंतर रॅलीचे विसर्जन करण्यात आले. यानंतर जाहीर सभा पार पडली. रॅली सरु असतांना रस्त्यावरील मंदिर व दर्गाहमध्ये जाऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह बसवराज धरणे व सर्व 20 नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी दर्शन घेतले.जाहीर सभेत बोलतांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले की, नळदुर्ग शहरात सध्या सुरु असलेल्या विकासाची घोडदौड पुन्हा कायम सुरु ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील मतदारांनी भाजपला विजयी करावे.आज शहरात 48 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम वेगात सुरु आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर शहरवासियांना दररोज पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर 150 कोटीपेक्षा जास्त निधीमधुन रस्ते, गटारी, पथदिवे, व इतर मुलभूत सुविधा उभारल्या जात आहेत. शहरातील रस्ते व नाली बांधण्याचे कामही लवकरच सुरु होणार आहे. नळदुर्ग येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु करण्यात आले आहे त्यामुळे प्रशासन आणि शासकीय सुविधा आता थेट जनतेच्या दारापर्यंत पोहचत आहेत. त्याचबरोबर नळदुर्ग शहरात महावितरणचे नविन उपविभागीय कार्यालय मंजुर झाले असुन ते लवकरच कार्यान्वित होणार आहे. नळदुर्गच्या विकासाचा प्रवास आता सुरु झाला असुन तो कधीच थांबु नये यासाठी नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपला विजयी करावे असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही केलेली विकास कामे घेऊन मतदारांसमोर जात आहोत असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी नितीन काळे,विनायक अहंकारी, दत्तात्रय दासकर, बसवराज धरणे, रीजवान काझी, ज्ञानेश्वर घोडके,शिवाजी गायकवाड यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक अहंकारी यांनी केले. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन डुकरे यांनी आपल्या समर्थकांसह आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post