नळदुर्ग :- नळदुर्ग शहराच्या विकासासाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नळदुर्ग येथे नगरपालिका निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्राचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलतांना केले.नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पुर्ण ताकदीनीशी लढवीत आहे. नगराध्यक्षासह नगरसेवकांच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट स्वबळावर लढवीत आहे. या उमेदवारांच्या प्रचारार्थ 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वा. नळदुर्ग येथील भवानी चौकात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेस आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, रमेश पिस्के, अझहर जागीरदार, अजित जुनेदी आदीजन उपस्थित होते.प्रारभी नळदुर्ग शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नगरपालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, नगरपालिकेची एकमुखी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात द्या मी बारामती आणि पिपंरी चिंचवडच्या धर्तीवर नळदुर्ग शहराचा विकास करुन दाखवितो.नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा देण्याबरोबरच नळदुर्ग शहराच्या विविध समस्या कायमस्वरूपी सोडविल्या जातील.सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा कानमंत्र कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे.मी सात वर्षांपासुन राज्याचा अर्थमंत्री म्हणुन काम करत आहे. त्यामुळे शहर विकासाच्या कामासाठी कधीच निधी कमी पडणार नाही.वसंतनगर येथील जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल. तुम्ही नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या,मी शहराचा विकास करून दाखवितो.राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार सर्व जाती पंथांच्या लोकांना एकत्र घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक लढवीत असतांना पक्षाने संजय बताले यांच्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या व कायम लोकांच्या कामासाठी उपलब्ध असणाऱ्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. नगरसेवक पदाची उमेदवारी देत असतांना आमी नविन चेहऱ्यांना व युवकांना उमेदवारी दिली आहे. नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या विकासासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. नळदुर्ग व तुळजापुर शहराचा पर्यटन क्षेत्राच्या धर्तीवर विकास करून यामध्ये स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर नळदुर्ग शहरात बसवसृष्टी, हरीत क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांचे स्मारक उभारण्याचे काम आम्ही करत आहोत असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले,शफीभाई शेख व मुश्ताक कुरेशी यांचीही भाषणे झाली. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले यांच्यासह सर्वच्यासर्व 20 नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद कुलकर्णी यांनी केले.
