नळदुर्ग :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे यांनी ऐन नगरपालिका निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच पक्षाला सोडचिट्टी देत आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. जगदाळे यांच्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची राजकीय ताकद वाढली आहे. जगदाळे यांच्या काँग्रेस प्रवेशाने नळदुर्ग नगरपालिकेतील राजकारणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे यांनी अचानक काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करुन राजकीय क्षेत्रात खळबळ उडवुन दिली आहे. त्यांच्या प्रवेशाने तुळजापुर तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. त्याचबरोबर नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीतील गणितही आता यामुळे बदलणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी उपनगराध्यक्ष शरीफ शेख, माजी नगरसेवक अमृत पुदाले, माजी नगरसेविका सुमन जाधव, विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, व्हाईस चेअरमन ताजोद्दीन सय्यद, रुकनोद्दीन शेख, अलीम शेख, अमोल सुरवसे, दत्ता राठोव व नवल जाधव यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.अशोक जगदाळे यांच्या काँग्रेस प्रवेशाने तुळजापुर तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळणार आहे. जगदाळे यांच्या प्रवेशामुळे तुळजापुर तालुक्यात काँग्रेसला एक मोठा नेता मिळाला असुन येणाऱ्या काळात पक्षाची संपुर्ण जबाबदारी अशोक जगदाळे यांच्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगदाळे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नगरपालिका निवडणुकीत नळदुर्ग शहरातील राजकारणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे.आता नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक काँग्रेस पक्ष जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
