नळदुर्ग :- मुस्लिम बांधवांनी सर्व नियमांचे पालन करुन बकरी ईद साजरी करावी असे आवाहन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत बोलतांना केले.4 मे रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने आगामी काळात साजरे होणारे सन, उत्सव, जयंती व बकरी ईद सणाच्या अनुषंगाने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन केले होते. नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक सचिन यादव हे होते तर हाफेज सय्यद मैनोद्दीन जहागिरदार, आलेम मोहम्मद रजा, हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार, फारूक अहेमद शेख, हाफेज बरकतअली मौजन,माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी शहेबाज काजी,माजी नगरसेवक विनायक अहंकारी, विलास येडगे, शहर काजी सोहेब काजी, अमेर शेख, वसीम कुरेशी, खय्युम सुंबेकर, चांद कुरेशी, खमर कुरेशी, मुजम्मिल कुरेशी,सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी धायगुडे, तलाठी संध्या कुलकर्णी, नगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी खलील शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलतांना पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी म्हटले की, मुस्लिम बांधवांनी बकरी ईदचा सण शासनाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन शांततेत व उत्साहात साजरा करुन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. ज्या ठिकाणी पवित्र नमाज अदा केली जाते त्याठिकाणी गर्दी होऊ देऊ नये त्याचबरोबर बकरी ईदचा सण साजरा करीत असताना गोवंशीय प्राण्यांची हत्त्या करू नये तसेच ज्याठिकाणी प्राण्याची कुर्बानी दिली जाते त्याठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. नगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत दक्ष राहुन स्वच्छता करावी, सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झापाट्याने वाढत आहेत. सण साजरा करीत असताना याचीही काळजी घेऊन सर्वांनी सण साजरे करावेत असे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी म्हटले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, शहेबाज काजी,आलेम मोहम्मद रजा,माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना नळदुर्ग शहरात हिंदु - मुस्लिम बांधव आपापले सर्व सण शांततेत साजरे करण्याची परंपरा याहीवेळी कायम ठेऊन बकरी ईदचा सण सर्व नियमांचे पालन करुन शांततेत व उत्साहात साजरा करणार असल्याचे सांगितले.
