नळदुर्ग:- गरीबांना मोफत देण्यात येणाऱ्या गहु व तांदळाची नळदुर्ग व परिसरात मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु असुन वैराग व सोलापुर येथील मुख्य तस्करांचा यांमध्ये समावेश असुन हे तस्कर नळदुर्ग शहर व परीसरातील दलालांना हाताशी धरून स्वस्त धान्य दुकान व विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गहु व तांदळावर डल्ला मारत आहेत. याची माहिती प्रशासनाला असताना सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्याची चर्चा नळदुर्ग व परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.या गहु व तांदळाच्या तस्करीला प्रशासनातील कांही अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही साथ असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर नळदुर्ग येथील साहेबांचा एक वसुलदार आहे जो या संपुर्ण तस्कारीचा प्रमुख असल्याचे बोलले जात आहे. सध्या या गहु व तांदळाच्या तस्करीचे नळदुर्ग हे मुख्य केंद्र बनले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब नागरीकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेनांतर्गत स्वस्त धान्य दुकानांमधुन मोफत धान्य देण्याचा एक चांगला आणि कल्याणकारी उपक्रम सुरु केला आहे. यामागे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा एकच उद्देश आहे तो म्हणजे देशातील एकही गरीब व्यक्ती अन्न धान्यावाचुन उपाशी राहु नये. मात्र आज कांही मंडळी याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसुन येत आहे. सध्या स्वस्त धान्य दुकानातुन देण्यात येणाऱ्या मोफत गहु आणि तांदळाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु आहे. नळदुर्ग शहर व परीसरातुन सध्या गहु आणि तांदळाची मोठ्या जोमात तस्करी सुरु आहे.वास्तविक पाहता काळ्या बाजारात गहु व तांदुळ विक्रीसाठी जात असतांना ज्या वेळेस गाडी पकडली जाते त्यावेळेस त्या गाडीत असणाऱ्या गहु व तांदळाची फोर्टी फाईड फुड लॅब टेस्टिंग करणे बंधनकारक आहे मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी तोडपाणी करुन ही टेस्टिंग न करताच गाड्या सोडुन देत असल्याचे दिसुन येत आहे.फोर्टी फाईड फुड (फोर्टीफाईड अन्न) लॅब टेस्टिंग म्हणजे अन्नातील अतीरीक्त सुक्ष्म पोषक घटक (लोह, फॉलिक ॲसिड, जीवनसत्वे A, D, B12, आयोडीन झिंक) योग्य प्रमाणात, सुरक्षिततेसह आणि एकसमान वितरीत आहेत की नाही हे तपासण्याची प्रयोगशाळेतील प्रक्रिया होय. ही चाचणी अन्न सुरक्षा आणि दर्जा नियमावली (FSSAI) नुसार उत्पादनाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी केली जाते. त्याचबरोबर ई - वेबील पाहुन हे धान्य कुठुन निघाले आणि कुठे जात आहे याची खात्री करणे महत्वाचे असतांना याचीही खात्री केली जात नाही. त्यामुळे धान्य तस्कर मस्तीत आले असुन आज ते कुणालाही न भिता खुलेआम गरीबांच्या धान्यावर डल्ला मारत आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, अंत्योदय योजना, प्रधान कुटुंब योजना तसेच शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गहु व तांदळाची कांही स्वस्त धान्य दुकानदारांसोबत संगमत करुन नळदुर्ग शहरातील मुख्य दलाल व व्यापारी पिशव्यांची आदलाबदल करुन शेकडो टन गहु आणि तांदुळ वैराग आणि सोलापुर येथील मुख्य तस्करांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. नळदुर्ग शहर व परीसरातील गांवातुन तसेच कर्नाटक राज्यातुन गहु आणि तांदुळ अक्कलकोट नळदुर्ग मार्गे सोलापुर व वैरागकडे जात आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन स्वस्त धान्य दुकानातुन तसेच विविध योजनेअंतर्गत गरीबांना देण्यात येणाऱ्या मोफत धान्याची तस्करी करणाऱ्या मुख्य तस्कारांसहा नळदुर्ग शहर व परीसरातील त्या दलालांच्या मुसक्या आवळुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्याचबरोबर या तस्करीला जे अधिकारी व कर्मचारी साथ देत आहेत त्यांच्यावरही कारवाई करुन या होत असलेल्या गहु आणि तांदळाच्या तस्करीला आळा घालावे अशी मागणी होत आहे.
