नळदुर्ग :- नेत्यांच्या पक्ष बदलण्याच्या मास्टरस्ट्रोकामुळे कार्यकर्त्यांची अक्षरशः गोची झाली आहे. ज्यांच्या सोबत आयुष्यभर राजकीय वैर राहिला त्याच्यासोबतच प्रचार करण्याची वेळ नळदुर्ग शहरातील अनेक कार्यकर्त्यांवर आली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचा तिकिटावर नेम त्यामुळे झाला कार्यकर्त्यांचा गेम म्हणण्याची वेळ शहरातील कार्यकर्त्यांवर आली आहे. राजकीय क्षेत्रात ज्या ज्या वेळेस राजकीय भूकंप होतो किंवा हादरे बसतात त्यावेळेस नेहमी असं म्हटले जाते की राजकारणात कोणीच कुणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो. त्याची प्रचिती नळदुर्ग शहरातील कार्यकर्त्यांना नळदुर्ग शहरात झालेल्या पक्ष बदलाचे तीन मोठ्या घटना मुळे झाली. दोन डिसेंबरला नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे नामनिर्देशन फार्म भरण्यासाठी सध्या भाऊ गर्दी झाली होती.अनेक जण तिकिटासाठी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात होते.तर काहीजण एकनिष्ठ राहत वेट अँड वाची भूमिका घेत आहे जिथे आहोत तिथेच समाधानी आहेत म्हणून पक्षाचा गमजा खांद्यावर घालून कामाला लागले आहेत . नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या वेग धरली आहे. त्याच गतीने पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील दिवसान दिवस वाढली आहे. नगरपालिका निवडणुकीचे काळात विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात कार्यकर्त्यांचा प्रवेश केल्यामुळे राजकीय समीकरण बनले व बिघडले आहेत. मात्र सर्वात जास्त गोची पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन नेत्यांचा जय हो म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांची झाली आहे. कारण पाच वर्ष नेत्याचा जय हो म्हणत विरोधकांसोबत पंगा घेणारे कार्यकर्त्यांना त्यांच्या सोबतच समेट घेऊन त्याच पक्षाचा झेंडा खांद्यावर घेण्याची वेळ आली आहे. नळदुर्ग नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार आहे. नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे त्यामुळे तिकीट मिळवण्याकरिता सर्वच राजकीय पक्षात रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे सर्वांनीच तिकिटासाठी जोर लावला होता. मात्र तिकीट आपल्याला मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर काही राजकीय नेते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यात काही जणांना यश देखील आले आहे. तर काही जणांनी पक्षाने जी भूमिका घेईल ती मान्य करत शांत झाले आहेत. तर काही जणांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या हम करे सो कायदा म्हणून वागणाऱ्या नेत्याला कंटाळून नवीन घरोबा केला आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याचे तीन प्रमुख घटनांमुळे राजकीय समीकरण बदलले आहे. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारी सदस्य अशोक जगदाळे यांनी अचानक मुंबई गाटत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर माजी नगरसेवक संजय बताले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मुंबई येथे आपल्या कार्यकर्त्यांचं जाहीर प्रवेश केला. त्यामुळे वरील दोघांच्या परमेश यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यात भर म्हणजे माजी नगराध्यक्ष शहेबाज काजी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत ओवेसी यांच्या एमआयएम पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मागील दहा-बारा दिवसात शहरातील तीन दिग्गज नेत्यांनी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात घरोबा केल्यामुळे नगरपालिका निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलून निवडणुकीत रंगत आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काही राजकीय भूकंप होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण अनेक जण पक्षाचे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.
