मूलभूत सुविधांमध्येच रुतला नळदुर्गच्या विकासाचा गाडा, धरण उशाला तरी 9 दिवसाला पाणी, पथदिवे बंद, रस्त्याची दुरवस्था

 

 नळदुर्ग :- नळदुर्गचा विकास हा घोषणांपुरता आणि पोस्टरपुरता आणि सोशल मीडियावरील पोस्ट पुरताच  राहिला आहे. शहरात रस्ते उद्ध्वस्त, पथदिवे बंद, घाणीचे साम्राज्य आणि 9 दिवस आड मिळणारे पाणी, एमआयडीसी किंवा कारखाने नसल्यामुळे रोजगाराची संधी नाही त्यामुळे तरुण  नोकरीसाठी स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे जनतेचा संयम संपत चालला आहे. बोरीधरण पाण्याने भरले तरी शहरवासीयांच्या घशाला कोरडाच उरला आहे.त्यामुळे दादा हाच का तो नळदुर्ग चा विकास ? असा प्रश्न विचारला जात आहे. 

************************** 

 धरण उशाला कोरड घशाला 

बोरी धरणातून नळदुर्ग, तुळजापूर अणदुर यांच्यासह एकूण पाच गावांना पाणीपुरवठा केला जातो.

बोरीधरणात मुबलक साठा असूनही नळदुर्गकरांना 9 दिवस आड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे 2016 साली पाणीप्रश्नावरून सत्ता उलथवणारे नागरिक आजही त्याच संकटात आहेत. 46 कोटी खर्चाची  अमृत 2.0 योजनेचे काम सुरू असूनही ते अर्धवट अवस्थेत आहे. सत्ताधारी असोत की विरोधक सर्वांनीच मौन धारण केल्यामुळे  शहरवासीय त्रस्त आहेत.

****************************

 शहरातील रस्त्यांची दुरावस्था 

शहरातील विविध भागात अंतर्गत रस्ते इतके खड्ड्यांनी भरले की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत आलेले तब्बल ९३ कोटींचे काम शहरात होणे अपेक्षित होते, पण कामे होत आहेत ती शहराबाहेर जिथे माणूसच नाही. लोकवस्ती ऐवजी निर्जन भागात रस्ते केली जात असल्याने ठेकेदार पोसले, जनता नाही, अशी संतप्त चर्चा शहरात रंगली आहे.

***************************

 राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे एक वर्षापासून बंद 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 वरील नळदुर्गच्या गोलाई ते बसस्थानक दरम्यान  1 कोटींच्या खर्चाने बसवलेले पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि स्थानिक प्रशासन दोन्ही ‘मौनव्रती’ झालेत. विकासाचे श्रेय घेणारे राजकीय नेतेदेखील गप्प! त्यामुळे शहरात संध्याकाळ होताच अंधार पसरतो आणि नागरिक विचारतात हाच का तो नळदुर्ग?

***************************

स्वच्छतेवर लाखो, तरी घाण कायम,

नगरपालिकेच्या वतीने दरमहा 8 लाख खर्च, 45 कामगार, 8 घंटागाड्या असूनही शहरात कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारी आणि दुर्गंधीचे साम्राज्य आहे. फवारणी नाही, सफाई नाही, त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे  मग प्रश्न उठतो, स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांचे मलिदा  कोण खातंय?

****************************

निधी आला, पण विकास गेला कुठे?

गेल्या चार वर्षांत विकासासाठी मोठा निधी आला. पण ठेकेदार व नेते यांची ‘कॉम्बिनेशन ठेकेदारी’ फोफावल्याने दर्जा रसातळात गेला. काही तथाकथित नेते स्वतःच ठेकेदार बनून कामे वाटून घेतात, फोटोसेशन करतात आणि जनतेला भ्रमात ठेवतात. नेता आल्यानंतर चमकोगिरी  करत हुजरेगिरी करणारे तथाकथित नेत्यांमुळे शहराचा विकास होण्याऐवजी शहर भकास झाला आहे. त्यामुळे निधी आला मात्र विकास कुठे गेला असा प्रश्न निर्माण होत आहे. 

**************************

रोजगाराची समस्या, 

एमआयडीसी नाही, कारखाने नाहीत,परिणामी तरुणांचे रोजगार संपलेत. शिक्षित बेरोजगार कट्ट्यांवर बसून वेळ घालवत आहेत, काहीजण नोकरीसाठी स्थलांतर करतात तर काही निराशेत गुन्हेगारीकडे वळतात. रोजगार नसल्यामुळे ही निवडणूक तरुणांसाठी ‘प्रश्न विरुद्ध नेते’ अशी ठरणार आहे.

****************************

सर्वच पक्ष अपयशी

रस्ता, पाणी, प्रकाश, स्वच्छता आणि रोजगार, या पाचही आघाड्यांवर नळदुर्गला सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीच शहरवासीयांना  धोका दिला आहे. त्यामुळे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत विकासाचे बोल बोलणारे, प्रत्यक्षात नळदुर्गला मागे नेणारे कोण?असा प्रश्न मतदार विचारतील.

 ************************** 

 विकासाच्या मारेकऱ्यांना रोखण्याची गरज 

शहराचा विकास करण्या ऐवजी स्वतःचाच विकास करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या विकासाच्या मारेकरी असलेल्या काही तथाकथित नेत्यांना  सत्तेपासून रोखण्यासाठी जाती-धर्माच्या फेऱ्यात भावनिक झालेल्या  युवा पिढीला जागृत होऊन काम करण्याची गरज आहे. कारण कोट्यावधी रुपयाचे निधी येऊन सुद्धा शहराचा म्हणावा तसा विकास होत नाही  त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व शहराच्या विकासाचा गाडा हाकण्याकरिता  विकासाच्या मारेकऱ्यांना  त्यांची जागा दाखवण्यासाठी जागो होणे गरजेचे आहे. व मतदान मागण्यासाठी आल्यानंतर त्यांना तुम्ही नळदुर्ग  चा काय विकास केला हे दाखवा म्हणून प्रश्न विचारणे गरजेचे आहे अन्यथा येणाऱ्या काळात तर विकास गायबच होईल हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

***************************

Post a Comment

Previous Post Next Post