नळदुर्ग:- नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या आतील व प्रवेशद्वारासमोरील मुलतानी गल्लीतील लोकांना अतिक्रमण काढून टाकण्यासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाने नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्याच्या सूचनेनंतर जिल्हास्तरावरील केंद्र व राज्य संरक्षित किल्ले व असंरक्षित गड किल्ले यांची अतिक्रमणे दूर करण्यासाठी तसेच पुनश अतिक्रमण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती या समितीची २७ जानेवारी २०२५ व ९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या बैठकीनंतर नळदुर्ग किल्ल्याच्या आतील व प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलत किल्ल्यातील ३४ व किल्ल्याच्या बाहेर प्रवेशद्वारासमोरील ८७ असे एकूण १२१ जणांना नगरपरिषद च्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे किल्ल्याचे प्रवेशद्वार समोरील मुलतानी गल्लीतील ८७ जणांना ३ मे २०२५ पर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यात यावे अन्यथा प्रशासन मार्फत अतिक्रमण काढण्यात येईल अशी नोटीस देण्यात आली आहे. तर किल्ल्याच्या आतील वस्तीत राहणाऱ्या लोकांना देखील तशीच नोटीस देण्यात आली आहे. मात्र अतिक्रमण हटविल्यानंतर त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कुटुंबीयांचे बाहेर इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
---------------------------------------------
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील मुलतानी गल्ली येथील ८७ लोकांना अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषद च्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडे खरेदीखत, न.प. रजिस्टर वर नोंद असलेली ८-अ नकल आहे त्याचबरोबर ८७ जणांपैकी अनेक मालमत्ता धारकांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना नगरपरिषद ने बांधकाम परवाने देखील दिले आहेत. जर ते अतिक्रमणधारक असतील तर नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण धारकांना कोणतेही कागदपत्रे नसताना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तसेच जर ते खरेदीखत असलेले मालमत्ता धारक असतील तर त्यांना अतिक्रमणधारक म्हणून नोटीस का देण्यात आली असा प्रश्न नोटीस बजावण्यात आलेल्या मुलतान गल्ली येथील लोकांतून होत आहे.
-----------------------------------------
पुरातत्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उपसंचालक पुरातत्व विभाग संभाजीनगर यांच्या कडे संबंधित जागे संदर्भात अहवाल तयार करून पाठविला होता. त्यानंतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती.त्यामुळे जिल्हाधिकारी दिलेल्या आदेशानुसार किल्ल्यातील तसेच किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील मुलतानी गल्लीतील लोकांना नोटीस बजावण्यात आले आहेत.तसेच किल्ल्याच्या आतील वस्तीत राहणाऱ्या लोकांना पर्याय म्हणून त्यांचे सर्वे नंबर २३६ मध्ये पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
लक्ष्मण कुंभार
मुख्याधिकारी नगर परिषद नळदुर्ग
------------------------------------------
किल्ल्यात राहणारे आम्ही अतिक्रमणधारक नव्हे तर खिदमतगार आहोत. या ठिकाणी राहुन आम्ही किल्ल्याच्या शाही मस्जिद ची शेकडो वर्षापासून दिवाबत्ती, झाडलोट,बांग देणे व नमाज पठण करुन सेवा करतो तसेच मस्जिद लगत असलेल्या कब्रस्तान मध्ये शेकडो वर्षापासून दफनविधी देखील केली जाते. त्यामुळे प्रशासनाने किल्ल्यातील आतील वस्तीत राहणारे मौजन समाजाचे पुनर्वसन करताना या सर्व गोष्टींना खंड पडू नये यासाठी सध्या बंद अवस्थेत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेत किंवा जवळच्या जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी बांधकाम करून देऊन पूर्ण पुनर्वसन करावा.
अनवरउल्ला मौजन
किल्ला वस्ती
----------------------------------------
आम्ही राहत असलेली जागा ही खरेदीखत करून घेतलेली जागा असून त्याची नोंद नगरपरिषद रजिस्टर वर असून मालकी हक्क आधारे नगरपरिषद ने ८-अ नकल दिलेली आहे.आम्ही या ठिकाणी मागील चार-पाच पिढ्यापासून राहतो.त्यामुळे अतिक्रमणधारक म्हणून ८७ जणांना नगरपालिकेच्या वतीने बजावण्यात आलेली ती नोटीस चुकीचे आहे.
मैनोद्दीन सय्यद
मुलतान गल्ली
किल्ल्या समोरील वस्ती
-------------------------------------------
