नळदुर्ग :- नळदुर्ग येथे ईद-ए-मिलाद सण( पैगंबर जयंती) रॅली व मिरवणूक व जामिया निजामिया युनिव्हर्सिटीचे शेखूल हदीस हाफेज सय्यद सगीर अहेमद जहागीरदार यांच्या धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता शहरातील क्रांती चौक येथून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या हस्ते हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जागीरदार, ईद-ए-मिलाद कमिटी चे अध्यक्ष सलीम शेख,हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार,हाफेज मुसा जमादार,हाफेज फारुख अहेमद शेख,हाफेज मोहम्मद मुद्दसर कुरेशी, पेश ईमाम सय्यद शाह मोहम्मद इनामदार, फरहउल्ला इनामदार माजी नगराध्यक्ष शहेबाज काजी, मुस्ताक कुरेशी,माजी उपनगराध्यक्ष नय्यर पाशा जागीरदार,शफी भाई शेख,इमाम शेख, शरीफ शेख, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण,अझहर जागीरदार, शहर काजी शोएब काजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झेंडा दाखवून मोटरसायकल व रिक्षा रॅली सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये मोटार सायकलस्वार, रिक्षा चालक व हातात झेंडे घेऊन लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ही रॅली भवानी चौक, शास्त्री चौक बसस्थानक समोरून राष्ट्रीय महामार्गाने गोलाई, इंदिरानगर, महामार्ग पोलीस ठाणे, अफजल हॉटेल, हुसेनी चौक, नानीमा रोड, चावडी चौक, डीसीसी बँक समोरून धर्मवीर संभाजी चौक, मोहम्मद पनाह मोहल्ला, काजी गल्ली, मुलतान गल्ली, किल्ला गेट मार्गाने परत बस स्थानकासमोर आल्यानंतर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने आयोजित फातेहाखानीच्या कार्यक्रमानंतर तबरूक( महाप्रसाद) चा वाटप करून दुपारी साडेबारा वाजता रॅलीची सांगता करण्यात आली. त्यानंतर रहीम नगर, ख्वाजा नगर, इंदिरानगर, व्यास नगर, नानिमा रोड येथील देखावे मिरवणुकीसह आसार मस्जिद येथे आल्यानंतर दुपारी तीन वाजता जुलूस ए मोहम्मदीच्या मुख्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. हि मिरवणूक काजी गल्ली,मोहदीस ए दख्खन हजरत अब्दुल्ला शहा साब चौक, मुलतान गल्ली, किल्ला गेट, कुरेशी गल्ली, इनामदार गल्ली, हत्ती मोहल्ला, भवानी चौक, चवडी चौक, भोई गल्ली मार्गाने परत आसार मस्जिद समोर आल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेले विविध भागातील देखावे आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले होते. मिरवणुकीच्या दरम्यान शहरात सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांच्या वतीने शहरातील विविध भागात फातेहाखानी करून ज्यूस व मिठाईचा कार्यक्रम घेऊन तबरूक वाटप करण्यात आला.तसेच तंझीम अबुल बरकात कमिटीच्या वतीने हाफेज सय्यद सगीर अहेमद जागीरदार यांचा धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जुलूस मध्ये देखावे सादर करणाऱ्यांना इनाम देऊन तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याबद्दल पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ईद-ए-मिलाद शांततेत साजरा व्हावा व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर, आनंद कांगणे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, संतोष गीते, विजय थोटे, जिविशाचे धनंजय वाघमारे, अमर जाधव यांच्यासह नळदुर्ग पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जुलूस मिरवणुकीतील देखावे चावडी चौकात आल्यानंतर नळदुर्ग शहरातील हिंदू बांधवांनी देखावे तयार करणाऱ्या विविध कमिटीच्या मान्यवरांचा सत्कार करून एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Tags:
नळदुर्ग
