येळकोट, येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने दुमदुमले श्रीक्षेत्र मैलारपुर 5 लाख पेक्षा जास्त भाविक मैलारपूर नगरीत

 

नळदुर्ग:- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे मल्हारी मार्तंड श्री खंडोबा देवाची यात्रा नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र मैलारपुर येथे 3 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली आहे 1 हजार  नंदीध्वजासह  5 लाख पेक्षा जास्त भाविक मंदिर परीसरात दाखल झाले होते. यावेळी भंडारा खोबऱ्याची मुक्तपणे उधळण सुरु होती.श्री खंडोबा आणि माता बाणाई यांच्या विवाहाने पावन झालेल्या नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र मैलारपुर येथील प्रसिद्ध असणाऱ्या खंडोबाची यात्रा 2 जानेवारी पासुन सुरु झाली आहे. यात्रेचा मुख्य दिवस  3 जानेवारी असल्याने यादिवशी श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक श्रीक्षेत्र मैलारपुरात दाखल झाले होते. येळकोट, येळकोट जय मल्हार चा प्रचंड जयघोष तसेच खोबरे, भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण व नंदीध्वजासह हलगीच्या तालावर बेभान होऊन नाचणारे वारू यामुळे मंदिर परीसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचबरोबर वाघ्या - मुरळीच्या ठसकेबाज व बहारदार गाण्याने यात्रेकरूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.3 जानेवारी 2026 रोजी रात्री 12.05 वाजता काकडा आरती करण्यात आली यानंतर 2 वाजता श्रीची महापुजा व आमभिषेक करण्यात आला. यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. भाविक बोरी घाटावर स्नान केल्यानंतर श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत येत होते. त्यामुळे पहाटेपासुनच भाविकांच्या दर्शनाची लांबच लांब रांग लागली होती. यावेळी दिवसभर देवाला नैवेद्य दाखविणे, लंगर तोडणे, तळी उचलणे, दंडवत घालणे, जावळ काढणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम सुरु होते.त्याचबरोबर भाविक खंडोबा मंदिरावर मोठ्या प्रमाणात खोबरे आणि भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करत होते. मंदिर परीसरात मानाचे नंदीध्वज दाखल झाल्यानंतर भाविकांसह ते वाजत गाजत जुन्या मंदिराला वळसा घालुन नविन मंदिरात येऊन श्री खंडोबा देवाचे दर्शन घेऊन ते आपल्या ठरलेल्या ठिकाणी जात होते. यावेळी नंदीध्वजासह नंदीध्वजावर लावलेल्या भगव्या आणि पिवळ्या झेंड्यामुळे मंदिर परीसर फुलुन गेला होता. दुपारनंतरही भाविक नंदीध्वजासह श्रीक्षेत्र मैलारपुरात येत होते.यावेळी निवडुन आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज धरणे व त्यांची नगरसेवकांची टीम यांनी यात्रेचे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे केले होते. यात्रेकरुंसाठी जागोजागी पिण्याचे पाणी,फिरते स्वच्छतागृह, यात्रेतील स्वच्छता तसेच अग्निशमन वाहन, त्याचबरोबर कुठल्या ठिकाणी कुठली व्यवस्था उपलब्ध आहे याच्या माहितीचे फलक यात्रेत जागोजागी लावण्याचे काम नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्यासह नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर हे या सर्व कामांवर लक्ष ठेऊन होते. नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यात्रेमध्ये चांगले काम केले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने यात्रेत प्राथमिक उपचार केंद्र सुरु करण्यात आले होते. याठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंचल बोडके व डॉ.सुरेंद्र मडके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेविका सुमन फुले व इतर आरोग्य कर्मचारी गरजु यात्रेकरुंवर उपचार करत होते. एमएसईबीचे सहाय्यक अभियंता दाऊद तगारे  व कर्मचारी यात्रेत विजपुरवठा सुरळीत राहवा यासाठी रात्रंदिवस काम करत होते. महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रक महेश डुकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी  यात्रेकरुंसाठी बस गाड्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे केल्यामुळे यात्रेकरूंना श्रीक्षेत्र मैलारपुरात येण्यासाठी कुठलीच अडचण निर्माण झाली नाही. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, आनंद कांगूणे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, संतोष गीते यात्रेत अतिशय कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे यात्रेकरूंना श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी कुठलाच त्रास होत नव्हता.श्री खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना रांगेत व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी दर्शन रांगेची सोय करण्याबरोबरच भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व मंदिर परीसरात सिसिटीव्ही बसविले होते. यात्रेकरूंची वाहने राष्ट्रीय महामार्गाच्या (बायपास रोड)  दोन्ही बाजुला लावण्यात आली होती. यात्रेमध्ये यात्रेकरुंसाठी आनंदनगरी उभारण्यात आली होती यामध्ये पाळणाघर, मौत का कुंआ, जादुचे प्रयोग, सर्कस आदी करमणुकीचे साधने उपलब्ध होते. त्याचबरोबर मंदिर परीसरात मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती. यामध्ये हॉटेल्स, देवदेवतांच्या मुर्त्यांची दुकाने, प्रसादाची दुकाने यांचा समावेश होता.

---------------------------------------------

1) आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातुन श्रीक्षेत्र मैलारपुर व परीसरात अतिशय रुंद व चांगल्या दर्जाचे सिमेंटचे रस्ते व नाली बांधण्याचे काम झाल्यामुळे यावर्षी खंडोबाची यात्रा अतिशय सुटसुटीत व वाहतुकीचा खोळंबा न होता विनाअडथळा पार पडली. नाहीतर दरवर्षी अरुंद रस्त्यांमुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक विस्कळीत होऊन यात्रा विस्कळीत होत होती.

2 )यावेळी प्रथमच नगरसेवक आकाश कुलकर्णी व नगरसेविका अपर्णा बेडगे यांनी यात्रेत येणाऱ्या महिला साठी स्नानगृहाची  व्यवस्था केली होती. त्यामुळे यात्रेत येणाऱ्या महिलांना कसल्याच प्रकारची अडचण झाली नाही. 

3)नगरपालिकेच्या वतीने यात्रेचे चांगले नियोजन करण्यात आल्यामुळे यात्रा चांगल्या प्रकारे पार पडली.

4) नुकतीच नगरपालिकेची निवडणुक झाली असल्याने यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष व नगरसेवकांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी शेकडो कंटाऊट लावले होते.

Post a Comment

Previous Post Next Post